एमर्जिंग अचिव्हर्स अवॉर्ड कौन्सिल कडून गौरव; वंध्यत्व उपचाराच्या क्षेत्रातील कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या नामवंत ज्येष्ठ भ्रूणतज्ज्ञ डॉ. कल्याणी रुशिकेश बडे यांना एमर्जिंग अचिव्हर्स अवॉर्ड कौन्सिलच्या वतीने भ्रूणतज्ज्ञ क्षेत्रातील डॉक्टरेट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बडे यांना गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. कल्याणी बडे यांनी हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्व पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींचा आहे. माझी आई सरोजिनी नागरगोजे आणि वडील डॉ. प्रल्हाद नागरगोजे यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. माझे पती रुशिकेश बडे आणि माझा मुलगा अवनीश बडे यांची मोठी साथ लाभली. मोठी बहीण डॉ. स्वप्नाली आणि भाची आस्था यांनी नेहमीच प्रेरणा दिली आहे. त्यांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच मी या टप्प्यावर पोहोचले आहे. तसेच, माझे मित्र परिवार आणि सहकारी यांनी प्रत्येक क्षणी माझा विश्वास वाढवला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. कल्याणी बडे यांनी न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथून जैवतंत्रज्ञानात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सध्या त्या अपोलो फर्टिलिटी सेंटर, मुंबई येथे ज्येष्ठ भ्रूणतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि वंध्यत्व उपचाराच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे.
डॉ. कल्याणी बडे यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विशेषतः आरोग्य व विज्ञान क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. छोट्या गावातून पुढे येऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्काररुपाने बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.