• Wed. Jul 23rd, 2025

नवीन जोडप्याच्या हस्ते 11 झाडांचे वृक्षारोपण

ByMirror

May 23, 2025

विवाह सोहळ्याला पर्यावरणाची जोड; आनंदाच्या क्षणात पर्यावरणपूरक पाऊल


वृक्ष लागवड भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रभावी मार्ग -शिवाजी पालवे

नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवत निर्मलनगर येथे विवाहानिमित्त 11 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वैभव संजय आव्हाड आणि निकिता यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला केवळ पारंपरिक स्वरूप न देता पर्यावरण संवर्धनाची जोड देत, आंबा, आवळा, लिंब अशा 11 झाडांचे वृक्षारोपण या नवविवाहित जोडप्याच्या हस्ते करण्यात आले.


या उपक्रमात परिसरातील अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, बबनराव पालवे, जगन्नाथ जावळे, दिनकर गिते, ज्ञानदेव चेमटे, संजय सानप, सुरेश दहिफळे, बाबासाहेब आव्हाड, मोहनराव आव्हाड, अश्रुबा पालवे, अर्जुन बडे, बळवंतराव पालवे, निवृत्त पोलीस अधिकारी श्‍याम जावळे, हरिश्‍चंद्र बडे, पप्पू गिते, राजेंद्र शेकडे, जय भगवान महासंघाचे संजय आव्हाड, सुमित डमाळ, ज्ञानेश्‍वर बडे, भारती डमाळ, ओंकार काकडे, पूनम खेडकर, शितल बुधवंत, आशा आव्हाड, रंजना बडे, पूजा दहिफळे आदी उपस्थित होते.


विवाह सोहळ्यासारख्या आनंदाच्या प्रसंगी झाडे लावून तो दिवस संस्मरणीय बनवण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला. जय हिंद फाउंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक गावात नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते झाडे लावण्यात यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


शिवाजी पालवे यांनी पावसाळा लवकर सुरू होत असल्याचे सांगून अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. वृक्ष लागवड ही केवळ निसर्ग रक्षणाचे साधन नसून, भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा एक प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.


रवींद्र शेकडे यांनी जय हिंद फाउंडेशनच्या पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवविवाहित जोडप्यांनी अशा हरित उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गावांना व परिसराला नंदनवनात रूपांतरित करावे. निसर्गाच्या सानिध्यात आनंदी जीवन जगता येणार असून, पर्यावरणाचे प्रश्‍न देखील सुटण्यास मदत होणार असल्याचे, ते म्हणाले. आभार माजी सैनिक बबन पालवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *