पिंपळगाव पिसा येथे ग्रामपंचायतीच्या नोटीशीनंतर प्रचंड संताप
कारवाई स्थगित करा किंवा पर्यायी जागा देण्याची मागणी; अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा (शेंडगे वस्ती) येथे गट नंबर 84 मधील शासकीय गायरान जमिनीवर मागील तीन पिढ्यांपासून राहत असलेल्या भूमिहीन आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीकडून घरे पाडण्याच्या नोटीसा देण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. भर पावसाळ्यात अशा प्रकारे घरांवर कारवाई करण्यासंदर्भात पीडित कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन, प्रशासनाकडे तात्काळ कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
याबाबत पीडित कुटुंबीयांच्या वतीने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. आदिवासी पारधी कुटुंबीयांच्या मागणीला बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी यावेळी सुमन भोसले, सुवर्णा भोसले, रवी पवार, गोपीनाथ भोसले, कार्तिक भोसले, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, जिल्हा महासचिव राजू शिंदे, योगेश खेंडके आदी उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी घरे बांधून द्यावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला राहण्यासाठी दुसरे ठिकाण नसल्याने आणि सध्याच्या पावसाळी परिस्थितीत लेकराबाळांना घेऊन घर सोडणे अशक्य असल्याने जबरदस्तीने कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नसल्याचे भावनिक आवाहन केले आहे.
ग्रामपंचायतीने केवळ आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबांना जागा खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्याच गटांमध्ये इतर समाजाची घरे असताना केवळ पारधी समाजावरच ही कारवाई होणे अन्यायकारक असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. त्यामुळे ही कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाने या कारवाईला स्थगिती न दिल्यास व पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही, तर 27 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा पीडित कुटुंबीयांसह बसपाच्या वतीने देण्यात आला आहे.