नियमबाह्य पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत सहकार अधिनियमाच्या नियमबाह्य कर्ज वाटप केल्याने संस्थेचे जिल्हा लेखा परीक्षक वर्ग एक मार्फत लेखापरीक्षण व वैधानिक तपासणी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यामधील दोषी चेअरमन, संचालक व सचिव यांच्यावर सहकार अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी एक महिन्यात कारवाई न झाल्यास सहकार आयुक्त कार्यालय (पुणे) समोर उपोषण करण्याचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
भाळवणी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव, संचालक मंडळ यांनी जिल्हा बँक शाखा भाळवणी व्यवस्थापक व विकास संस्थेचे ऑडिट यांच्या संगणमताने केले आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या ठेविदार व सभासदांची फसवणूक करून वरून सदर व्यक्तींनी भाळवणी विकास संस्थेमार्फत कोर्टाचे व इतर संस्थेचे जप्ती आदेश असतानाही बेकायदेशीरपणे आदेशाला केराची टोपली दाखवून चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेच्या व संस्थेच्या ठेकेदार व सभासदांची फसवणूक केली आहे. तसेच इतर कर्जासह पशुपालन कर्जामध्ये शंभर टक्के घोटाळा करून सदर व्यक्तींनी संचालक व कर्मचारी यांनी अफरातफर केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जप्तीचे व कोर्टाचे मनाई आदेश असताना देखील कर्ज वाटप करण्यात आले आहे. हा आदेश झुगारून त्याची पायमल्ली करण्यात आली आहे. सन 2019 पासून आजतागायत या गटावर बेकायदेशीर रित्या संचालक मंडळ, सचिव, जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक, ऑडीटर यांच्या संगनमताने ठेवीदार सभासदांची व कर्जदार सभासदांची वारंवार फसवणूक करून, सदर लोकांनी स्वतःच्या हितासाठी संस्थेची फसवणूक केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदरील अधिकारी व संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावे, यामुळे ठेविदार सभासद यांना न्याय मिळणार आहे. या प्रकरणाचा भंडाफोड होण्यासाठी भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे जिल्हा लेखा परीक्षक वर्ग एक मार्फत लेखापरीक्षण व वैधानिक तपासणी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.