सोलापूर येथे मान्यवरांच्य हस्ते होणार सन्मान; गावाची विकासात्मक वाटचाल व सामाजिक कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव (ता. नगर) येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदचे (मुंबई) राज्य कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अहिल्यादेवी फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड व कार्याध्यक्ष महादेव महानोर यांनी दिली.
अहिल्यादेवी फाउंडेशन यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा वितरणाचे आयोजन रविवारी (दि. 25 मे) रोजी सकाळी 10 वाजता, निर्मिती लॉन्स, विजापूर रोड सोलापूर येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमदार प्रकाश (अण्णा) शेंडगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त (पुणे) डॉ. नितीन वाघमोडे, आयकर आयुक्त (मुंबई) डॉ. सचिन मोटे, सहाय्यक पोलीस आयुक्त (पुणे) रुक्मिणीताई गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरले, तनिष्का फाउंडेशनचे अनिल भीमराव जाहीर, मिसेस इंडिया श्वेता परदेशी, रिल स्टार प्राजक्ता मालुंजकर उपस्थित राहणार आहे.
आबासाहेब सोनवणे यांनी गेल्या 25 वर्षे पंचायत राज व्यवस्था मध्ये सरपंच व सदस्य म्हणून काम पाहिले आहे. कृषी, जलसंधारण, पंचायत राज व्यवस्था बळकटीकरण, दुष्काळी गावाची ओळख पुसून पाणीदार हिंगणगाव ओळख निर्माण केल्याचे कार्य त्यांनी केले आहे.
गावाशी जोडणारे सर्व रस्ते मजबुतीकरण, डांबरीकरण करुन शेतपानंद शिवार रस्ते मुक्त करून वहिवाटीस खुले करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पेयजल योजना राबवणे, गावातील प्राथमिक शाळा खोल्यांचे आरसीसी बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, सुसज्ज असे अमरधाम, वृक्षारोपण आदी विकासात्मक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. कोरोना काळात झोकून काम करून आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. सांगली सातारा पूरग्रस्तांना मदत आदी त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.