दूरच्या तालुक्यातील प्रशिक्षण शिक्षकांना प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे – बाबासाहेब बोडखे
प्रशिक्षणाच्या ठिकाण बदलाची मागणी; अहिल्यानगरचा स्थानिक पर्याय पुढे
नगर (प्रतिनिधी) – २ जून ते १२ जून २०२५ मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण केंद्रात बदल करावा अशी मागणी शिक्षक परिषदेने केलेली आहे . जर प्रशिक्षण संगमनेर येथे झाले तर त्यावर आक्षेप घेतला असून, हे ठिकाण जिल्ह्यातील अनेक शिक्षक, विशेषतः महिला शिक्षकांसाठी प्रवासाच्या दृष्टीने गैरसोयीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हे प्रशिक्षण केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची भेट घेऊन प्रशिक्षणाच्या नियोजित ठिकाणाबाबत हरकत नोंदवली. या वेळी परिषदेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात, संगमनेर हे ठिकाण जिल्ह्यातील अनेक शिक्षकांसाठी, विशेषतः महिला शिक्षकांसाठी, प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे
निवेदनात पुढे सांगण्यात आले की, प्रशिक्षणासाठी शिक्षकांची संख्या विचारात घेऊन, ज्या तालुक्यांमध्ये १०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी आहेत, त्या ठिकाणीच प्रशिक्षण केंद्र निश्चित करावे. तसेच जिल्ह्याचे दोन विभाग – उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करून अनुक्रमे संगमनेर आणि अहिल्यानगर येथे प्रशिक्षण घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याप्रसंगी कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, अभिजीत गवारे, दीपक आरडे, ए.बी. भोगे, दिपक शिरसाठ यांच्यासह अनेक शिक्षक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षक परिषदेच्या निवेदनानुसार, प्रशिक्षण केंद्र ठरवताना केवळ प्रशासनाच्या सोयीऐवजी, प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी असलेल्या शिक्षकांच्या सोयीचा विचार केला जावा. विशेषतः ग्रामीण भागातील महिला शिक्षकांना संगमनेरला ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पर्यायी ठिकाण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.