• Wed. Jul 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

निंबळक येथे भक्तिरसात न्हालेल्या संगीतमय रामकथेचा समारोप

ByMirror

May 13, 2025
रामकथेतून जीवनाला दिशा मिळते -अनिता काळे

सप्ताहाच्या पहिल्याच वर्षी हजारो भाविकांचा उदंड प्रतिसाद;


रामकथेतून जीवनाला दिशा मिळते -अनिता काळे


नगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील निंबळक गावात पार पडलेल्या सात दिवसीय संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याचा समारोप भक्तीमय वातावरणात पार पडला. ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे यांच्या संगीतमय कीर्तनांनी आणि रामकथेच्या विविध प्रसंगांनी भाविक मंत्रमुग्ध झाले.


या सप्ताहात त्यांनी रामायणातील प्रसंग सादर करताना आई-वडिलांचे महत्त्व, बंधुप्रेम, आणि समाजातील दुर्बलांच्या मदतीचे मोल असे जीवनमूल्ये प्रभावी भाषेत व संगीताच्या माध्यमातून विशद केली. कीर्तनामध्ये त्यांनी शबरीची भक्ती, भरताचा त्याग आणि सीतेची शुद्धता असे हृदयस्पर्शी प्रसंग सादर करून विविध रामायणातील प्रसंगाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.


हा धार्मिक सोहळा श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 365 व्या वैकुंठगमन दिनानिमित्त आणि वै. लक्ष्मण रंगनाथ काळे, वै. विजयादेवी लक्ष्मण काळे व वै. अजित लक्ष्मण काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षा अनिता काळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.


सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी उपस्थित राहून सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि.प. सदस्य माधवराव लामखडे, सरपंच प्रियंका लामखडे, उद्योजक अजय लामखडे, आयोजक अनिता काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात महिला भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रामाच्या अयोध्यागमनाच्या प्रसंगी महिलांनी आनंदात फुगड्यांचे फेर धरून उत्सवाला रंगत आणली.


कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अनिता काळे यांनी सांगितले की, रामकथेतून जीवनाला दिशा मिळत असते. या कथेतून बोध घेऊन अनेकांचे जीवन सफल झाले आहे. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी या कथेचे आयोजन केले होते. या सप्ताहाचे हे पहिले वर्ष असून, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून हे दरवर्षी आयोजित केले जाईल. तसेच लवकरच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


सप्ताहातील सात दिवस संगीतमय रामकथेसह विविध धार्मिक कार्यक्रम, हरिपाठ, भजन, अभिषेक आणि महाआरती अशा अध्यात्मिक वातावरणाने गावात भक्तीचा महोत्सव अनुभवता आला. महाप्रसादाच्या वितरणाने सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या भक्तीमय सोहळ्यामुळे पंचक्रोशीत अध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली असून, पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात हा सोहळा साजरा केला जाईल, असा विश्‍वासही काळे यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *