• Wed. Jul 2nd, 2025

महाराष्ट्र दिनी अवयवदात्या कुटुंबांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

ByMirror

May 2, 2025

मरणानंतरही अवयवदानाने इतरांना नवजीवन देवून मिळते अमरत्व

नगर (प्रतिनिधी)- युवकाच्या अपघाती मृत्यूनंतर दुःख पचवत अवयवदानाने इतरांना नवजीवन देण्याचा महान निर्णय घेतलेल्या अवयवदात्या कुटुंबाचा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस मुख्यालय येथे शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर हा विशेष सत्कार समारंभ पार पडला.


या कार्यक्रमात स्व. योगेश डोंगरे (वय 25, रा. साकूर, ता. संगमनेर) यांचे बंधू गणेश किसन डोंगरे, तसेच अनिल कचरु आमले, गोरख तान्हाजी बागुल, एकनाथ विठ्ठल गंभीरे या परिवारातील सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे, अवयवदान समन्वयक राज गिरी, जिल्हा नेत्र व अवयवदान जागृती समुपदेशक सतीश आहिरे हे उपस्थित होते.


25 वर्षीय योगेश डोंगरे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांना ब्रेन स्टेम डेथ घोषित करण्यात आले. अशा कठीण प्रसंगी त्यांचे कुटुंबीयांनी धाडसाने निर्णय घेत योगेशचे अवयव दान करण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. त्यांचे अवयव विविध रुग्णांना प्रत्यारोपणासाठी यशस्वीरित्या वापरण्यात आले. हा संपूर्ण अवयवदान प्रकल्प डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या वैद्यकीय पथक, जिल्हा शासकीय रुग्णालय, आणि प्रशासनाच्या समन्वयाने पार पडला.


समुपदेशक सतीश आहिरे यांनी सांगितले की, ब्रेन स्टेम डेथ झाल्यानंतरही अवयव कार्यरत असतात. अशावेळी नातेवाईकांनी पुढाकार घेऊन अवयवदान केल्यास इतरांचे प्राण वाचू शकतात. ही माणुसकीची आणि समाजहिताची सेवा आहे. यासाठी सर्व नागरिकांना अवयवदानाबाबत सकारात्मक विचार करण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *