क्षणिक सुखा सारखी या जगात दुसरी विपत्ती नाही, असे लोक भौतिक सुखाचे दास होतात -अजिनाथ खेडकर
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर येथे कार्यरत उपअभियंता अजिनाथ खेडकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झालेले खेडकर यांच्या सेवापूर्तीचा जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी होले, अभियंता हर्षल काकडे, किरण कदम, उपअभियंता अजीनाथ खेडकर, पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, वरिष्ठ लिपिक श्रीमती सप्तर्षी आदींसह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
होले म्हणाले की, उपअभियंता अजिनाथ खेडकर यांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहून कार्य केले. त्यांनी सेवाकाळात नगर तालुका, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तालुकाच्या ठिकाणी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या ग्रामीण भागात कामे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते एक कुशल अभियंता असून त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागात नावलौकिक मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
उपअभियंता अजीनाथ खेडकर म्हणाले की, लोभ आणि चंगळवादाला बळी पडलेले लोक दिव्य लोकातही सुख प्राप्त करू शकत नाही. तर पृथ्वीतलावरील लोकांची काय कथा! भौतिक क्षणिक सुखा सारखी या जगात दुसरी विपत्ती नाही. भौतिक सुख मोह माये समान आहे. आणि भौतिक सुखाने ग्रस्त लोक विषय सुखाचे दास होतात. परंतु सत्याची जाणीव झाल्यास विषय सुखाचे भय वाटते, म्हणून सुज्ञ माणसाने भौतिक सुखाची कामना करू नये असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अजिनाथ खेडकर म्हणाले की, शासनाने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीचे भान ठेऊन लोककार्यासाठी काम केले तर अडचण येणार नाही. लोकसेवेत काम करताना सामाजिक बांधिलकी जोपासून योगदान दिल्यास त्या कामाला यश मिळणार आहे. हे मी माझ्या सेवाकार्यात अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले.