उन्हाच्या तीव्र झळांतही पक्षी वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
विद्यार्थ्यांनी रुजवले संवेदनशीलतेचे बीज
नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या पक्ष्यांना आधार देण्यासाठी मुठभर धान्य आणि घोटभर पाणी! हा उपक्रम राबविला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेने 40 अंशाच्यावर तापमान वाढत चाललेले असताना पक्ष्यांना जगणे सुसह्य होण्याच्या दृष्टीकोनान हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरासह प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या घरी झाडांखाली, अंगणात, गच्चीवर आणि परिसरातील उद्यानांमध्ये धान्य व पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मुठभर चार प्रकारचे धान्य शाळेत आणून दिले. जमा झालेल्या धान्याच्या पोत्यातून दररोज धान्य शालेय परिसरातील झाडे व उद्यानात टाकून पक्ष्यांची भूक भागवली जात आहे. तसेच पाण्यासाठी खाऊच्या पैशातून विद्यार्थ्यांनी छोटे भांडे विकत घेऊन पाण्याची सोय केली आहे.
उन्हाळ्यात पाणी व अन्नाच्या अभावामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी शाळेतील शिक्षिका उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल, शितल रोहकले, शिल्पा कानडे, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, इंदुमती दरेकर, पुनम धाडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी सांगितले की, पशुसेवा ही ईश्वरसेवा आहे. मुक्या प्राण्यांप्रती दया व करुणा या मानवी मूल्यांचे बीज विद्यार्थी वयात रुजविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुठभर धान्य व घोटभर पाणी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना विकसित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, अंबादास गारुडकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे यांनी शाळेच्या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष कौतुक केले आहे. हा उपक्रम संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत अविरत सुरू राहणार असून, विद्यार्थी पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय करणार आहेत.