भक्तिभावाने नटलेल्या सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील हनुमान नगर परिसरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात सात दिवस चाललेल्या श्रीमद् भागवत कथा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता रविवारी (दि. 27 एप्रिल) उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. या सप्ताहाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण सोहळ्याचे आयोजन व नियोजन केले होते.
हा धार्मिक सोहळा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला. सप्ताहात दररोज काकड आरती, ग्रंथ वाचन, हरिपाठ व श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता.
या धार्मिक कार्यक्रमाची सांगता ह.भ.प. बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. बाबाजी महाराजांनी राम व कृष्ण चरित्रातील साम्य व वैशिष्ट्ये प्रभावीपणे उलगडून दाखवली. विशेषत: तरुण-तरुणींना जीवनातील संस्कारांचे महत्त्व पटवून देताना त्यांनी आजच्या काळातील दृष्ट शक्तींचा नाश करण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उपस्थितांनी जाहीर निषेधही व्यक्त केला.
या धार्मिक सप्ताहात ह.भ.प. केशव महाराज बाबर देऊळगावकर यांच्या प्रभावी वाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले. कथेमध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून कृष्णचरित्रातील क्रांतीकारक बाजू उलगडण्यात आली. काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडून सप्ताहाची सांगता करण्यात आली. बाबाजी महाराज चाळक यांचा परिसरातील सर्व महिलांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी इंदुबाई कदम, सुनीता पवार, निर्मला इंगळे, भक्ती पवार, सरिता भगत, रोहिणी बनकर, शितल नाडे, ॲड. निलीमा मुसळे, नंदा नामदास आदी महिलांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, ॲड. गोरख मुसळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सप्ताहात ह.भ.प. गणेश महाराज गोंडे, विष्णु महाराज घुणे, दत्तात्रय महाराज तापकीर, उमेश महाराज माळी, दिलीप महाराज खळतकर, माऊली महाराज सौताडे यांनी संगीताच्या साथीसह वातावरण अधिक रंगतदार केले. शेवटी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण सप्ताह सोहळा हनुमान नगर येथील शिवभक्त युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने यशस्वीपणे पार पडला.