• Wed. Oct 15th, 2025

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समाजाकडून निषेध

ByMirror

Apr 25, 2025

दहशतवादाला धर्म नसतो, ते माणुसकीचे शत्रू; काळ्या फिती लावून केला संताप व्यक्त

शुक्रवारच्या नमाजनंतर मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली

नगर (प्रतिनिधी)- काश्‍मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप 26 नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शुक्रवारी (दि. 25 एप्रिल) दुपारी सर्जेपूरा येथील तांबोळी कब्रस्तान मरकज येथे नमाज अदा केल्यानंतर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी काळ्या फिती लावून या भ्याड हल्ल्याचा विरोध दर्शवला.


या श्रद्धांजली सभेला अब्दुल सलाम खोकर, हाजी मन्सूर शेख, मौलाना अफजल, हाजी अकिल शेख, हाजी रऊफ टायरवाले, हामजा शेख, शाहरुक शेख, अब्दुल रहेमान सौदागर, आसिफ शेख, साजिद शेख, रफिक वेल्डर आदींसह शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्र येत दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करुन या भ्याड हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केली.


अब्दुल सलाम खोकर म्हणाले की, दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. हे माणुसकीच्या तत्वांना पायदळी तुडवणारे कृत्य आहे. बायसरनमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानवजातीच्या विरोधात आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे समाजात दहशतीचं वातावरण निर्माण होतं. केंद्र सरकारने अशा प्रवृत्तींना उखडून टाकण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत. इस्लाम धर्म कुठल्याही निरपराध व्यक्तीच्या हत्येची परवानगी देत नाही. धर्माच्या नावावर दहशतवाद करणाऱ्यांचा इस्लामशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.


हाजी मन्सूर शेख म्हणाले की, ईस्लाम हा शांती, प्रेम, सहिष्णुता व मानवी मूल्यांचा धर्म आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचे समर्थन इस्लाम करत नाही. धर्माविरोधातील हे कृत्य असून, निष्पाप लोकांचे प्राण घेणाऱ्यांना मानवी समुदायात जागा नाही. मुस्लिम समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्व भारतीय खंबीरपणे उभे असल्याचे त्यांणी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *