• Thu. Jan 22nd, 2026

वणव्यात नष्ट झालेली हिरवळ… वाचलेल्या झाडांसाठी धावला जय हिंद फाऊंडेशन

ByMirror

Apr 23, 2025

गर्भगिरी पर्वतरांगांतील वणव्यात वाचलेल्या झाडांना टँकरने पाणी

निसर्गरक्षणाचा संकल्प घेतला, तरच हे वैभव पुन्हा उभे राहू शकते -शिवाजी पालवे

नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील कोल्हारजवळ असलेल्या गर्भगिरीच्या पर्वतरांगेत लागलेल्या भीषण वणव्यात मोठ्या प्रमाणावर जंगल जळून खाक झाले आहे. लोहसर ते कोल्हार दरम्यान सुमारे 6 ते 7 किलोमीटरचा परिसर या आगीत उद्ध्वस्त झाला असून, अनेक झाडे, औषधी वनस्पती, पशु-पक्षी आणि वन्यजीवांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत जय हिंद फाउंडेशनने पुढाकार घेत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे. फाउंडेशनने गर्भगिरीतील वाचलेल्या झाडांना पाणी देण्याचे काम हाती घेतले असून, निसर्गाला पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे.


या उपक्रमासाठी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, रामेश्‍वर पालवे, लखन पालवे, रामा नेटके आदी स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष डोंगरात जाऊन श्रमदान केले. त्यांनी पाण्याच्या टँकरद्वारे डोंगरातल्या झाडांना पाणी दिले.


शिवाजी पालवे म्हणाले की, गर्भगिरीसारख्या निसर्गसंपन्न पर्वतावर पुन्हा पुन्हा वणवे लागणे ही चिंतेची बाब आहे. ही आग नैसर्गिक की मानवनिर्मित, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. निसर्गाचे हे नुकसान म्हणजे आपल्याच भविष्यासाठी खड्डा खोदण्यासारखे आहे. वणव्यात फक्त झाडेच नव्हे, तर त्या झाडांवर अवलंबून असणाऱ्या अनेक पक्ष्यांचे घरटे, प्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. आज निसर्गाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक डोंगर, टेकडी, जंगल आपलेच आहे, हे लक्षात ठेवून आम्ही या झाडांना पाणी देण्याचे कार्य सुरू केले आहे. यासाठी गावकरी, युवक, विद्यार्थी यांनीही पुढे यावे. निसर्ग संवर्धनासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करुन माणसाने निसर्गरक्षणाचा संकल्प घेतला, तरच आपण हे वैभव पुन्हा उभे करू शकतो, असे त्यांनी सांगितले.


या आगीबाबत वन विभागाने त्वरित चौकशी करावी, अशी मागणी जय हिंद फाउंडेशनने केली आहे. वणवा लावणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *