• Thu. Oct 16th, 2025

शहरात सरपंच परिषद व मराठा सोयरीकचा वधू वर मेळावा उत्साहात

ByMirror

Apr 18, 2025

शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न शासन दरबारी मांडणार -दत्ताभाऊ काकडे

राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर (प्रतिनिधी)- जे मुले लग्न जमत नसल्यामुळे एकल म्हणजे विधवा, घटस्फोटीत महिलांसोबत लग्न करतील अशा जोडीचा शासनाने विविध स्तरावर सन्मान करावा, त्यांना प्रोत्साहन द्यावे ही मराठा सोयरीक संस्थेची मागणी आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारी जरूर मांडू, असे प्रतिपादन सरपंच परिषद मुंबईचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी नगर येथील वधू-वर मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी केले.


नुकतेच शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात मराठा सोयरीक संस्थेचा मोफत 96 वा मराठा वधू वर परिचय मेळावा सरपंच परिषदेच्या सहकार्यातून पार पडला. या मेळाव्यास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रात 40 वयाच्या आतील एकल महिलांची संख्या खूप आहे. तसेच 30 वयापेक्षा जास्त लग्न न जमणाऱ्या मुलांची संख्या तर हजारो मध्ये आहे, म्हणून अशा लग्न न जमणाऱ्या मुलांनी एकल महिलांशी विवाह केल्यानंतर शासनाने व समाजाने त्यांना मान्यता देऊन प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे या दोन्ही घटकांना न्याय मिळेल, अशी मागणी मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे हे प्रत्येक मेळाव्यात करत असतात. नगरच्या मेळाव्यात त्यांनी ही मागणी मांडल्यानंतर त्याला सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी वरील प्रमाणे सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.


या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच परिषद कोअर कमिटीचे उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे, कोअर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे, संजय गांधी योजना कमिटीचे तालुकाध्यक्ष राजू दारकुंडे, किशोर मरकड, मधुकर निकम, पारुनाथ ढोकळे, ॲड. स्वाती जाधव, सिताराम काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.


मराठा सोयरीक संस्थेचे कार्य व मेळाव्याची पद्धत कौतुकास्पद असल्याचे सरपंच परिषदेचे कोअर कमिटीचे उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे म्हणाले. तर सरपंच परिषदेमार्फत अनेक ठिकाणी मेळावे घेण्यास सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या वधू-वर मेळाव्यात 161 मुलं व 51 मुलींची नाव नोंदणी झाली. राजेंद्र उदागे यांनी कार्यालय उपलब्ध करुन दिल्याबद्दल राजेंद्र उदागे व आबासाहेब सोनवणे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय शिंदे, जयंत नलावडे, पी.पी तनपुरे, चंद्रकांत मुळे, रवींद्र पानसंबळ, राजेंद्र पवार, विलास कांडेकर, विलास काळे, विनोद संजय सोनवणे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन रेवन्नाथ पवार यांनी केले. आभार संजय गांधी निराधार योजना कमिटीचे तालुकाध्यक्ष राजू दारकुंडे यांनी मानले.


पुढील 97 वा मराठा वधू वर परिचय मेळावा पुण्यातील चंदननगर मध्ये, जुन्या भाजी मंडईतील मनपा शाळेच्या हॉलमध्ये 20 एप्रिल रोजी 11 वाजता आहे. 98 मेळावा आळंदी शहरात रविवार दि. 27 एप्रिल रोजी ज्ञानसागर मंगल कार्यालयात 11 वाजता होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 7020281282 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *