सुंदरकांडच्या भक्तीमय वातावरणात अरुणकाका जगताप यांच्या आरोग्यासाठी भाविकांची प्रार्थना
नगर (प्रतिनिधी)- झेंडीगेट येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिरात सुंदरकांड पारायण भावपूर्ण वातावरणात पार पडले. या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी हनुमानजीच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. मंदिरात साजरे करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महाआरती, स्तोत्र पठण आणि भक्तिगीते यांचा समावेश होता.
मंदिराचे पुजारी रामदास कावट यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच अनिल झंवर, संजय कासट, साईनाथ कावट, नंदकुमार झंवर, दिलीप बिहाणी, दशरथ दरक, संजय इस्सार, दत्तात्रय आखमोडे, बद्रीनारायण राठी, पप्पू कुलवार, सुरेखा विद्ये, कीर्ती कासट, मंगला बिहाणी, कल्पना लड्डा आदींसह अनेक भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला.
अतुल भंडारी यांच्या पुढाकाराने अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीसाठी सुंदरकांड पारायण करण्यात आले होते.पुणे येथील खासगी रुग्णालयात अरुणकाका जगताप यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी दक्षिणमुखी मंदिरातही मनोभावे प्रार्थना करण्यात आली. सर्व भाविकांनी त्यांचे लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.