• Sun. Jul 20th, 2025

शासकीय मालमत्तेची चोरी असूनही कारवाई नाही

ByMirror

Apr 9, 2025

दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरी प्रकरण: ग्रामसेवक व सरपंचांवर पक्षपातीपणाचा आरोप

21 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- मौजे बांगार्डे (ता. श्रीगोंदा) येथील दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरून नेल्याच्या प्रकरणात संबंधित आरोपीवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामपंचायतीवर व ग्रामसेवकांवर पक्षपाती कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार घनश्‍याम शेळके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.


तक्रारीनुसार, पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप एका व्यक्तीने चोरून नेऊन स्वतःच्या गोठ्यात वापरले होते. याबाबत पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या आदेशानुसार पंचनामा देखील करण्यात आला. यानंतर संबंधित आरोपी दिनकर शेळके याने सदर पाईप ग्रामपंचायतीकडे परत केले. मात्र शासकीय मालमत्तेची चोरी स्पष्ट असूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


तक्रार, उपोषण व आंदोलने करूनही ग्रामसेवक व सरपंच यांनी आरोपीला पाठीशी घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप घनश्‍याम शेळके यांनी केला आहे. गावात या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याचीही चर्चा रंगली आहे. गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनीही याप्रकरणी कारवाईसाठी सूचना व लेखी पत्रे दिली आहेत.


या प्रकारामुळे ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करून, शासकीय मालमत्ता चोरल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 21 एप्रिलपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील तक्रारदाराने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *