भिंती पत्रकाचे अनावरण
समाजबांधवांना एकत्रित आणून विवाह जुळविण्याचे कार्य दिशादर्शक -बाळासाहेब बारवकर
नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 एप्रिल रोजी शहराच्या टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात माळी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या भिंती पत्रकाचे अनावरण करुन सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रुई छत्रपती (ता. पारनेर) येथील माजी सरपंच बाळासाहेब बारवकर म्हणाले की, पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, शिक्षण व करियच्या मागे धावणाऱ्या युवक-युवतींसाठी लग्नाचे विषय गंभार बनत चालले आहे. वधू-वर परिचय मेळाव्यातून सर्व समाजबांधवांना एकत्रित आणून हा प्रश्न सोडविण्यासाठी सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात जनवार्ता परिवाराने 35 विवाह वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून जमविले आहे. हा सहावा वधू वर मेळावा आहे. प्रथम वधू-वर, घटस्फोटीत विधवा, विधूर अपत्य, विनाअपत्य, दिव्यांग अशा सर्वांसाठी माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले असून, वधूसाठी कायमस्वरूपी मोफत नोंदणीची सेवा दिली जात आहे. जनवार्ता परिवाराचे पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, गणेश बनकर यांच्या माध्यमातून हा मेळावा पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या अहिल्यानगर शहरातील या वधू-वर परिचय मेळाव्यात विविध जिल्ह्यातून समाजबांधव सहभागी होणार आहेत.