• Wed. Oct 15th, 2025

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; 234 शाळांचा सहभाग

ByMirror

Apr 7, 2025

वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास व नेतृत्वगुण विकसित करते -आमदार सत्यजित तांबे

नगर (प्रतिनिधी)- आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील एकूण 234 शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.


या स्पर्धेचा बक्षीस वितरण नुकताच शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व रायझिंग ट्रायबल फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद शिंदे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा व व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. सत्यजित तांबे यांची प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे व शैक्षणिक उपक्रम राबवण्याचे कार्य संघटनेतर्फे सातत्याने केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, वक्तृत्व स्पर्धा ही केवळ बोलण्याचे व्यासपीठ नसून, ती विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्‍वास आणि व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे. आत्मविश्‍वासाच्या जोरावरच विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठावीत. माझीही शालेय कारकीर्द वकृत्व स्पर्धेतूनच सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. तर घेण्यात आलेल्या स्पर्धेचे कौतुक केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब गवते यांनी केले. प्रास्ताविक प्रसाद शिंदे यांनी केले, तर यादी वाचन बंडू गाडेकर यांनी आणि आभार मुनव्वर खान यांनी मानले. याप्रसंगी अमोल क्षीरसागर, नारायण अनुभुळे, प्रमोद तोरणे, अनिता साठे, राहुल मोरे, रिबीका क्षेत्रे, किशोर कार्ले, किरण डहाळे, प्रवीण साळवे, विजय साळवे, वैभव सांगळे, रवी गावडे, अरुण पवार, दत्तात्रय झगडे, लोणकर सर, निलेश बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *