परीक्षा काळात नोकरी गमावलेल्या व काही बेरोजगार युवकांना मिळाली संधी
समाजात विद्यार्थ्यांना सक्षमपणे उभे करण्याचे काम भाई सथ्था नाईट हायस्कूल करत आहे – ज्योतीताई कुलकर्णी
नगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 36 विद्यार्थ्यांना एमआयडीसी कंपनीत प्लेसमेंट देण्यात आले. नुकतेच रात्रशाळेसह समाजातील गरजवंत, बेरोजगार सर्व विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांसाठी महिनाभर सुट्टी घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या पुढाकाराने व मासूम संस्थेच्या सहकार्याने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एमआयडीसी मधील विविध कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना जागेवर प्लेसमेंट दिल्या. परीक्षा काळात नोकरी गमावलेल्या व काही बेरोजगार युवकांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यात आली. मासूम संस्थेच्यावतीने रात्रशाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करियरवर मार्गदर्शन शिबिराचा देखील या रोजगार मेळाव्यासाठी फायदा झाला.
विद्यार्थ्यांना रात्रशाळेत शिक्षणाबरोबर करियर घडविण्याचे कार्य देखील मासूम संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांना समाजात सक्षमपणे उभे करण्याचे काम भाई सथ्था नाईट हायस्कूल करत असल्याचे रात्र शाळेच्या चेअरमन प्रा.ज्योतीताई कुलकर्णी यांनी सांगितले.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजितशेठ बोरा, दादा चौधरी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, रात्र शाळेच्या चेअरमन प्रा.ज्योतीताई कुलकर्णी, माजी चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, कमलाकर माने, युवराज बोराडे, पॉल रेमेडियस, निलेश ठोंबरे यांनी नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.