कीर्तनच्या भक्तीरसाने भाविक मंत्रमुग्ध
परमार्थाशिवाय जगात काहीच नाही -गणेश शिंदे
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मध्ये आयोजित कीर्तन महोत्सवाचा भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. गुढी पाडव्यानिमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रंगलेल्या या भक्तीमय सोहळ्यात भाविक मंत्रमुग्ध झाले. किर्तन महोत्सवाचे हे चौथे वर्ष होते.

ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांच्या काल्याचे कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. शिंदे महाराज म्हणाले की, परमार्थाशिवाय जगात काहीच नाही. पूर्वीच्या काळात माणसे वाईट वागत नव्हती, त्यामुळे त्याना चांगले वागा शिकवायची गरज भासत नव्हती. या कलयुगात कीर्तन, प्रबोधन, विचारवंतांच्या प्रबोधनानंतरही समाजात अपेक्षित असलेला बदल होताना दिसत नाही. सामाजिक जाणीव ठेऊन कार्य करणारे अमोल येवले सारखे हिरे चांगल्या विचाराने बदल घडवू शकतात. या परिसराला चांगला नगरसेवक मिळाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागली. त्यांच्या मागे मोठ्या संख्येने असलेली युवा शक्ती परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किर्तनात गणेश शिंदे यांना महाराष्ट्राची महागाईका सन्मिता शिंदे यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात साथे देवून भाविकांना मंत्रमुग्ध केले. जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन समाजात संस्कार रुजविण्याबरोबर सामाजिक दिशा देण्याचे काम करत आहे. दरवर्षी केडगावकरांना कीर्तन महोत्सवाची पर्वणीने सर्व भाविक भक्तीरसाने न्हाहून निघत असल्याची भावना केडगावकरांनी व्यक्त केली.
केडगाव येथे सुरु असलेल्या पाच दिवसीय किर्तन महोत्सवासाठी भाविकांनी पहिल्याच दिवसापासून समारोप पर्यंत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. माजी नगरसेवक अमोल येवले यांनी केडगावकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी सर्व भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले.