सेवक संचालक पदाच्या नियुक्तीसाठी उच्च न्यायालयाचे आदेश
नगर (प्रतिनिधी)- सेवक संचालक पदाच्या नेमणुकीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा सहकारी बँक व संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला जॉईंट रजिस्टार सहकारी संस्था नाशिक विभाग यांना आदेश पारित केले आहेत. या निकालामुळे ज्या बँका नियमाप्रमाणे असलेल्या सेवक संचालक पदाच्या नियुक्तीसाठी चालढकल करतात त्यांना या निकालाने चपराक बसली आहे. दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश आले आहे.
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी वरील दोन्ही बँकेच्या विरोधात मान्यता प्राप्त युनियनने नेमणूक केलेले सेवक संचालक व संबंधित बँकांनी स्वीकारले नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे सन 2024 मध्ये याचीकेद्वारे दाद मागितली होती. या याचिकेची नुकतीच सुनावणी होऊन न्यायालयाने जॉईंट रजिस्टार सहकारी संस्था नाशिक विभाग यांना जिल्हा सहकारी बँकेवर विद्या अजय तन्वर व श्रीमंत घुले यांची तसेच संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेवर वाघोबा शेलार व तुकाराम सांगळे यांच्या नेमणुकीबाबत निकालाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची संबंधित बँकेच्या सेवक संचालक पदी नेमणूक करण्याचे व तसे वरील दोन्ही बँकांना कळविण्याचे निर्देश दिले आहेत.
युनियनच्या वतीने ॲड. शरद नातू यांनी औरंगाबाद खंडपीठात बाजू मांडली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दोन्ही बँकेच्या सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सेवकांच्या हिताकरिता व हक्कासाठी युनियन कायम अग्रणी असेल, अशी ग्वाही कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली.