ग्रामीण भागात 20 वर्षापासून डोंगरे यांनी व्यसनमुक्तीसाठी चालवलेली चळवळ दिशादर्शक -किरण जाधव
नगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यशवंत सेना, जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने डोंगरे यांना नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत उपसरपंच किरण जाधव व ग्रामपंचायत अधिकारी गोवर्धन राठोड यांनी पै. नाना डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी माजी उपसरपंच प्रमोद जाधव, ग्रामपंचायत केंद्र संचालक माधुरी जाधव, दीपक जाधव, गणेश येणारे, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
उपसरपंच किरण जाधव म्हणाले की, ग्रामीण भागात डोंगरे संस्थेच्या माध्यमातून मागील 20 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व्यसनमुक्तीसाठी चालवित असलेली चळवळ दिशादर्शक आहे. युवकांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून जागृती करण्याचे काम ते विविध उपक्रमातून करत आहे. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. युवा पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत असून, त्यांना रोखण्यासाठी जागृती सुरु असल्याचे स्पष्ट केले. तर या चळवळीत ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.