छावा मराठा युवा संघटनेचे नायब तहसीलदारांना निवेदन
जागा बळकाविण्यासाठी गाव गुडांची शेतकरी कुटुंबीयांवर दहशत
नगर (प्रतिनिधी)- जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील शेतकऱ्याच्या शेत जमीनीत मुरुमाचे अवैध पद्धतीने बेकायदेशीरपणे उत्खनन करून त्याची विक्री केल्याप्रकरणी आणि विनापरवाना शेतातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याने पंचनामा करुन गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रकरणी संघटनेच्या शिष्टमंडळाने पिडीत शेतकऱ्यासह नायब तहसीलदार (महसूल) अभिजीत वांढेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील, शेतकरी अर्जुन वाडेकर, राजू पवार, भाऊसाहेब वाडेकर, दत्तात्रय वाडेकर आदी उपस्थित होते.

चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे गट नंबर 251 मध्ये अर्जुन वाडेकर यांची शेत जमीन आहे. जागेचा वाद न्याय प्रविष्ट असून, वाडेकर सध्या शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. काही गावगुंडांनी वाडेकर यांच्या शेत जमिनीवर ताबा मारण्याच्या उद्देशाने जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन करून मुरुमाची विक्री केली आहे. तर 40 ते 50 वर्षांपूर्वीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करुन व शेत जमीनीचे नुकसान करुन पर्यावरणाची हानी केली असून, संबंधित शेतकरी कुटुंबीयांवर दहशत निर्माण केली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी महसूल विभागाकडे बोट दाखवून कारवाई टाळली असल्याचा आरोप अर्जुन वाडेकर यांनी केला आहे. शेत जमीनीत मुरुमाचे अवैध पद्धतीने केलेल्या उत्खननाचा पंचनामा करुन गाव गुंड असलेल्या जेसीबी व ट्रॅक्टर मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा नगर तहसिल कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.