• Sun. Mar 16th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले -प्रेमराज बोथरा

ByMirror

Mar 16, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

260 रुग्णांची मोफत हृदय तपासणी

नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले आहे. महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातून हृदयासंबंधी असलेल्या विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण येत आहेत. 2004 मध्ये सेवाभावाने सुरु झालेल्या या सेवेने सर्वसामान्यांच्या हृदयात घर करुन मोठा विश्‍वास संपादन केला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हृदयासंबंधी सर्व शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या असून, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर सोशल हब म्हणून उदयास आले असल्याची भावना प्रेमराज बोथरा यांनी व्यक्त केली.


राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये स्व. जतनबाई मानकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार व पारस ग्रुपच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रेमराज बोथरा बोलत होते. बोथरा परिवारातील सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनिषा बोथरा, संगिता बोथरा, प्रतिभा बोथरा, मंगलताई रुनवाल (विजापूर कर्नाटक), सीए आयपी अजय मुथा, सतीश लोढा, डॉ. आशिष भंडारी, अनिल मेहेर, डॉ. अमित थोपटे, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. गिरी, डॉ. गवळी, डॉ. पारधे आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात सीए आयपी अजय मुथा म्हणाले की, बोथरा परिवाराने उद्योग व सामाजिक क्षेत्रात नाव उंचावले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निर्मितीपासून ते वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी उभारण्यासाठी या परिवाराचे महत्त्वाचे योगदान मिळत आहे. हॉस्पिटलच्या प्रगतीच्या विविध टप्प्यांवर या परिवाराने भक्कमपणे योगदान दिले आहे. फक्त आर्थिक हातभार न लावता, तन व मनाने ते सेवा देत असून, शहरातील विविध महत्त्वकांशी सामाजिक प्रकल्पात ही त्यांचे मोलाचे योगदान आहे. समर्पण भावनेने बोथरा परिवाराचे कार्य सुरू असून, त्यांची नवीन पिढी देखील या सेवा कार्यात योगदान देत आहे. वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीसाठी त्यांची मोलाची साथ लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.


सतीश बोथरा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेसाठी सर्व तन, मन, धनाने योगदान देत आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना दूर करण्याचे काम हे आरोग्य मंदिर करत आहे. ही आरोग्यसेवा रुग्णांना आधार देणारी ठरत असून, ही सेवा महाराष्ट्राची शान बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अनिकेत कटारिया म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये अद्याप पर्यंत 25 हजारपेक्षा जास्त बायपास सर्जरी, 50 हजारपेक्षा अधिक एन्जोप्लास्टी व 1 लाखापेक्षा अधिक अँजिओग्राफी करण्यात आलेली आहे. तसेच 2 हजार लहान बालकांच्या ह्रद्यरोग संबंधी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बायपास सर्जरी ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केल्या जात आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत होत असल्या तरी त्याचा दर्जा सर्वोत्तम ठेवण्याचे काम तज्ञ डॉक्टर करत असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात 260 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. तर शिबिरात सहभागी गरजूंची 3 हजार रुपयात अँजिओग्राफी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. पाहुण्यांचे स्वागत डॉ. आशिष भंडारी यांनी केले. अनिल मेहेर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *