सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व महिला दिनाचा उपक्रम
महिलांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांचे स्मृतीदिन व महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पालकांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, योगिता वाघमारे, अहिल्या सांगळे यांचा सत्कार मंदा भोसले व सुनंदा भोसले यांनी केले. याप्रसंगी अनुजा घुले, सुनंदा भोसले, सीमा घुले, त्रिमुखे, सय्यद, स्वरा रहाटळ, शेख, दिपाली त्रिमुखे, आजमाना सय्यद, आसमा शेख आदींसह महिला उपस्थित होत्या.
अनिता काळे म्हणाल्या की, महिला या सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करत असून, त्यांना प्रत्येकाने संधी व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कुटुंबातील प्रत्येक महिलेला उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिल्यास खऱ्या अर्थाने महिला दिन व सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंदा भोसले यांनी जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षिका सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे काम करत आहे. शिक्षकांच्या कार्यातून भावी पिढीचे उज्वल भवितव्य घडत असून, त्यांचा सन्मानार्थ हा कार्यक्रम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.