मन हेलावणाऱ्या महिला मनोरुग्णांच्या व्यथा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले
नगर (प्रतिनिधी)- सावेडीतील आंनद योग केंद्रात जागतिक महिला दिन आरोग्याचा जागर करुन साजरा करण्यात आला. महिला दिनी झालेल्या या कार्यक्रमात योग साधनेने महिलांना निरोगी जीवनाचे मुलमंत्र सांगण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित मनगाव प्रकल्पाच्या डॉ. सुचेता धामणे उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिलांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी महिलांनी योग, प्राणायमाकडे वळावे. मनोबल वाढविण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त असून, महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबाच्या व्यस्त जीवनक्रमातून स्वतःसाठी वेळ काढून आनंदी जीवन जगण्याचे आवाहन डॉ. धामणे यांनी केले.
बेवारस मनोरुग्णांसाठी हक्काचे घर बनलेल्या मनगाव प्रकल्पाबद्दल माहिती देताना डॉ. धामणे म्हणाल्या की, 28 वर्षांपूर्वी रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण महिला पाहून त्यांना डबे आणून देण्यापासून या प्रकल्पाची सुरुवात झाली. या महिलांना राहण्यासाठी घर, आरोग्य सेवा आणि प्रेम दिले पाहिजे या स्वप्नातून मनगाव प्रकल्प उभे राहिले. यामध्ये मनोरुग्ण असलेल्या आणि त्यांच्यावर अत्याचार झालेल्या महिलांचा देखील सांभाळ केला जाऊ लागला. मन हेलावणाऱ्या विविध मनोरुग्णांच्या व्यथा ऐकून उपस्थित महिलांचे डोळे पाणावले. मनगाव मध्ये आज साडेचारशे महिला व चाळीस मुले राहत असल्याचे त्यांनी माहिती दिली.
महिलांच्या जीवनावर आधारित आनंद केंद्राच्या 20 महिलांनी नाटिका सादर केली. यामध्ये महिलांनी स्त्रीच्या जन्मापासून ते बालपण, शिक्षण, लग्न, वृद्धावस्थेतील संघर्ष दाखविण्यात आला. एवढ्या संघर्षातही महिला त्याग, समर्पण, प्रेम, माया, ममता शूरता आणि आत्मविश्वास या गुणांमुळे यशस्वी होत असल्याचे दाखवून, नाटिकेतून स्त्री ही अबला नसून सबला असल्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात अलका कटारिया यांनी डॉ. धामणे यांचा सत्कार केला. अपेक्षा संकलेचा यांनी नाटीकेचे दिग्दर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन उषा पवार, सोनाली जाधवर, पूजा ठमके, प्रतिक्षा गीते, रेखा हाडोळे, स्वाती वाळुंजकर, संगीता जाधव, स्मिता उदास यांनी केले होते.