अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आरोप; आझाद मैदानात उपोषणाचा इशारा
खासदार लंके यांच्या उपोषणानंतर चौकशीचे काय झाले?
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) मधील भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी 25 जुलै 2024 रोजी गठीत केलेल्या चौकशी समिती कडून कुठलीही कारवाई न झाल्याने, याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून चौकशी समिती व दोषी एलसीबी कर्मचारी यांची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी 21 दिवसात कारवाई न झाल्यास आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) मधील भ्रष्ट कारभार विरोधात खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले होते. स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचारी यांनी मनमानी कारभार करून अवैध माया जमा केली, त्यातून अवैध संपत्ती जमा केली त्याबाबत असणारे पुरावे निलेश लंके यांनी कार्यालयात दिले होते. त्यातील काही कर्मचारी यांच्यावर अनेक वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होऊनही तेच कर्मचारी त्याच पदावर कार्यरत आहेत. काही हवलदार असलेल्यांना एलसीबी विभागात घेण्यात आलेले असल्याचे स्पष्ट केले होते.
खासदार लंके यांच्या उपोषणाची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. परंतु आज अखेर पत्रावर झालेल्या चौकशी अहवाल 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेला नाही. चौकशी कारवाई पूर्ण न झाल्यामुळे, नाशिक परिक्षेत्र यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांच्याकडून अद्याप निर्णय होणे बाकी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पोलीस महासंचालक मुंबई व गृह विभाग मंत्रालयाकडून सदर पत्राची दखल घेऊन 21 दिवसात कारवाईने न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.