सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचा उपक्रम; महिलांनी केला नेत्रदान, अवयव दानाचे संकल्प
फुले दांम्पत्यांचा सामाजिक वारसा फिनिक्स फाऊंडेशन चालवत आहे -जालिंदर बोरुडे
नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 70 महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची देखील तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 गरजू महिलांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ महिला लिलावती अग्रवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिबिराचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी यमुनाबाई शिंदे, अंजना गाडेकर, कोमल पाखरे, शहेनाज सय्यद, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदींसह महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, देशात स्त्रीला सन्मान व प्रतिष्ठा सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षण चळवळीने मिळाली आहे. महिला सक्षमीकरणाचे खरे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन महात्मा फुलेंनी पुरोगामी विचारांची मांडणी केली व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले. वंचित घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा देऊन त्यांचा वारसा फिनिक्स सोशल फाऊंडेशन पुढे चालवत असल्याचे सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे सदर शिबिर पार पडले. यामध्ये गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. फिनिक्स फाऊंडेशनच्या आवहानाला प्रतिसाद देत काही ज्येष्ठ महिलांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयव दानाचे संकल्प अर्ज भरुन दिले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बोरुडे, गोरख गाडेकर, विशाल भिंगारदिवे, सौरभ बोरुडे, वैभव दानवे आदींसह फिनिक्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.