महिलांनी लुटला झुंबा नृत्याचा आनंद; एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम व टिम 57 यांचा महिला दिनाचा उपक्रम
महिलांनी स्वत:चे आरोग्य सांभाळल्यास कुटुंब व समाज निरोगी आणि सुदृढ होणार -शितल जगताप
नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम व टिम 57 यांच्या वतीने महिलांच्या स्वास्थ्य जागरुकता उपक्रमाने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांसाठी सूर्यनमस्कार, योगा व विविध स्पर्धा पार पडल्या. या कार्यक्रमातून महिलांना सदृढ आरोग्याचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी झुंबा नृत्यासह विविध मनोरंजनात्मक खेळ रंगले होते.
माजी नगरसेविका शितल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी योगिता पर्वते, गीता पर्वते, मनिषा पर्वते, एकता पर्वते, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सुषमा साळुंके, सुनंदा मुळे, हेमा पडोळे, उषा सोनी, सुरेखा चेमटे, सुनिता कोळी, लीला अग्रवाल, उषा सोनटक्के, मेघना मुनोत, श्रध्दा उपाध्ये, नंदा पुरोहित, सिमा बंग आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शितल जगताप म्हणाल्या की, जीवनशैली बिघडल्याने अनेक आजारांचा सामना महिलांना करावा लागत आहे. निरोगी जीवनासाठी महिलांना नियमित व्यायाम करणे गरजेचे बनले आहे. व्यायाम व योगाने मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते. नियमित योगाने दिनचर्या प्रसन्न बनते. व्यायामासाठी वयाचे बंधन नसते, तर वेळ नसला तरी वेळ काढावा लागतो. महिलांनी कुटुंब सांभाळताना, आरोग्य देखील सांभाळल्यास कुटुंब व समाज निरोगी आणि सुदृढ होणार असल्याच्या त्या म्हणाल्या.
एकदा पर्वते म्हणाल्या की, महिलांना कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आरोग्य उत्तम राहणे महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्य असल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकते. यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी दिवसातून एक तास व्यायामाला देण्याचे त्यांनी आवाहन केले.
सूर्यनमस्कार, योगा आणि विविध मनोरंजनात्मक स्पर्धेतील विजेत्या महिलांना शितल जगताप यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या स्वास्थ्य जागरुकता कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम मध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने विशेष लक्ष दिले जात असून, योगा, झुम्बा आदींसह एमएमए सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली.