• Wed. Mar 12th, 2025

माध्यमिकच्या सर्व परीक्षा 15 एप्रिल पर्यंत घेण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

ByMirror

Mar 8, 2025

उशीराने परीक्षा घेण्याच्या निर्णयाने शाळांची व शिक्षकांची कोंडी होणार -बाबासाहेब बोडखे

शिक्षकांना पाच दिवसात उत्तर पत्रिका तपासणे, निकाल व प्रगती पुस्तक लिहिण्याचा येणार ताण

नगर (प्रतिनिधी)- इयत्ता 1 ली ते 9 वी वार्षिक (पॅट) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन वेळापत्रकात बदल करून सर्व परीक्षा 15 एप्रिल पर्यंत घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे व कार्यवाहक शिवाजी घाडगे यांनी जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्फत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण प्रधान सचिव यांना पाठविले आहे. तर राज्यातील इयत्ता 1 ली ते 9 वी च्या परीक्षा मार्च ऐवजी 8 ते 25 एप्रिल दरम्यान घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे शाळांची व शिक्षकांची कोंडी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 3 री ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पेट) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे वेळापत्रक सध्या निर्गमित केले आहे. संकलित चाचणी दोनचे वार्षिक परीक्षा 25 एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश आहेत. त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापक शिक्षकांना अनेक प्रश्‍न उद्भवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


25 एप्रिल 2025 ला शेवटचा पेपर ठेवला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसात उत्तर पत्रिका तपासणी, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तक लिहिणे इत्यादी कामे चार ते पाच दिवसात होणे शक्य नाही. माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात एका शिक्षकाकडे किमान चार ते पाच विषयाचा कार्यभार असतो. त्यामुळे उत्तर पत्रिका चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. मुंबई, ठाणे यासारख्या शहरातील शाळांमधील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत मूळ गावी अथवा बाहेरगावी जातात. बस किंवा रेल्वेचे तीन महिन्यापूर्वी आरक्षण केलेले असते. एनवेळी वेळापत्रक बदलल्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा सुरु ठेवणे योग्य होणार नसल्याची भूमिका शिक्षक परिषदेच्या वतीने मांडण्यात आली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे.


इयत्ता 1 ली ते 9 वी वार्षिक (पॅट) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन वेळापत्रकात बदल करून सर्व परीक्षा 15 एप्रिल पर्यंत घेण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू व कार्यालयीन मंत्री निरंजन गिरी यांनी देखील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व शालेय शिक्षण प्रधान सचिव यांना निवेदन दिले आहे. या मागणीसाठी राज्य व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *