• Thu. Mar 13th, 2025

चौका-चौकातील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी

ByMirror

Mar 7, 2025

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी; शहर वाहतूक शाखेला निवेदन

अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता वाहतूकीचे योग्य नियोजन होणे आवश्‍यक -इंजि. केतन क्षीरसागर

नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाढती वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी प्रमुख चौका-चौकातील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहर वाहतूक शाखेकडे करण्यात आली आहे.


आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना निवेदन देऊन शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत होण्याबाबत चर्चा केली. यावेळी दीपक वाघ, किरण घुले, ऋषिकेश जगताप, मंगेश शिंदे, राजू मकासरे, रोहित सरना, कृष्णा शेळके, कुणाल ससाणे, गौरव हरबा, ओंकार मिसाळ, केतन ढवण आदी उपस्थित होते.


शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील अपघाताची संख्या देखील वाढत आहे. शहरातील विविध प्रमुख चौकातील सिग्नल हे बऱ्याचदा बंद असतात, त्यामुळे नागरिकांना विशेषत: वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी व महिलांना वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रमुख चौकात बंद सिग्नल कार्यान्वीत करुन व वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्‍न सुटणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


शहर वाहतूक शाखेने बंद सिग्नल यंत्रणा तातडीने सुरु करावी आणि प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, टेक्निकल टीमची नेमणुक करुन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.



शहरातील अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता वाहतूकीचे योग्य नियोजन होणे आवश्‍यक आहे. अनेक चौकातील सिग्नल बंद अवस्थेत असल्याने वाहतुक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वाहतूकीचे योग्य नियोजन होण्यासाठी शहर वाहतूक शाखेने तातडीने बंद सिग्नल सुरु करुन, नेहमी वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकात वाहतूक पोलिसांची नेमणुक करणे गरजेचे आहे. -इंजि. केतन क्षीरसागर (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *