आपली मातृभाषा मनापासून जपा – कवी अमोल बागुल
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले मातृभाषेचे महत्त्व
नगर (प्रतिनिधी)- मातृ म्हणजे आई. आई बोलते ती भाषा म्हणजे मातृभाषा होय. मांडीवरचे बाळ आईच्या चेहऱ्याकडे पाहून दंतव्य, तालव्य, जिव्हय, व ओष्ठ्य अशी अक्षरे व शब्द शिकत असते. आईच्या बोलण्यातला गोडवा, लडिवाळपणा ते बाळ आईच्या चेहऱ्याच्या भावावरून आत्मसात करत असते. यातून त्याच्या मनात मातृभाषा जन्म घेत असते. अशी मातृभाषा आपण मोठे झाल्यावर आपल्या श्रवण, भाषण, वाचन, लेखन या चार घटकांतून जपली पाहिजे. अशी मातृभाषा मनापासून जपा, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त कवी, लेखक डॉ. अमोल बागुल यांनी केले.
महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय आणि केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ. बागूल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक, साहित्यिक व भौगोलिक दाखले देत, विविध उदाहरणे सांगत डॉ. बागुल यांनी मराठी भाषेचे महत्त्व हसत खेळत, गप्पा गोष्टींमधून विद्यार्थ्यांना समजून सांगितले. मातृ म्हणजेच आई आणि आईची भाषा ही कधीही विसरायची नसते. लहान मूल जसं पहिल्यापासून काही शिकत तसेच मराठी भाषेचे देखील आहे. मराठी भाषेला आपण कधीही विसरू नये, तिचा नेहमी आदर करावा. त्यांनी मुलांच्या मुखातून शब्द कसा निर्माण होतो? याविषयी सांगितले. आईविषयी गेय कवितेसह बागुल यांनी अनेक कविता सादर केल्या. तसेच आपल्या सुमधुर बासरीवादनाने मुलांची मन जिंकली. यावेळी शाळेच्या कलाशिक्षकांनी मोडी लिपीतून साकारलेले फलकलेखन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक अनिल गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री देशपांडे यांनी केले. मनीषा बोर्ड यांनी आभार मानले.