कानडे यांची सातत्याने सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्गाला न्याय देण्याची भूमिका राहिली -रावसाहेब काळे
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी आमदार लहू कानडे यांची निवड झाल्याबद्दल सह्याद्री छावा संघटना आणि धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याप्रसंगी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, मेजर शिवाजी वेताळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रावसाहेब काळे म्हणाले की, आमदार असताना लहू कानडे यांनी सदैव सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा केला. त्यांची सातत्याने सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्गाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. ते पराभवानंतरही खचले नाहीत, त्याऐवजी समाजकार्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. या नवीन पदाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करुन त्यांना न्याय देण्यासाठी कार्य करणार आहे. छावा व धडक जनरल कामगार संघटनेचे त्यांच्या कार्यास सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीधर शेलार यांनीही लहू कानडे यांच्या कार्याचे कौतुक करुन लहू कानडे यांनी कायमच कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी विविध संघर्षांच्या माध्यमातून अनेक कामगारांचे प्रश्न सोडवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली असून, ते कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचविण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना लहू कानडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय आणि धोरणानुसार समाजाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी श्रमिक वर्गाच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच सक्रिय राहील. शासकीय योजनांचा लाभ आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले.