• Thu. Mar 13th, 2025

पारनेरच्या बाबुर्डीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

ByMirror

Mar 5, 2025

जिल्ह्यातील मल्लांना सहभागी होण्याचे आवाहन; विजयी मल्लांना चांदीची गदा बक्षीस

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालीम संघ आणि पारनेर तालुका तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रविवार दि.9 मार्च रोजी खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुर्डी (ता. पारनेर) येथे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष पै. युवराज पठारे व नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा खजिनदार पै. नाना डोंगरे यांनी केले आहे. या निवड चाचणीत खुल्या गटात माती व गादी विभागातील विजयी मल्लांना चांदीची गदा बक्षीस दिले जाणार आहे.


या निवड चाचणीतून जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडला जाणार असून, हा संघ कर्जत मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या 66 वी वरिष्ठ गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024-25 मध्ये सहभागी होणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सदरची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मार्च दरम्यान संपन्न होणार आहे.


जिल्हा निवड चाचणी बाबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे. खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड आणि आरसीजी ग्रुपचे अध्यक्ष पै. लाला भोंडवे यांनी या निवड चाचणीचे आयोजन केले आहे.


कुस्ती स्पर्धा गादी व माती विभागात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो आणि महाराष्ट्र केसरी ओपन गटात पार पडणार आहे. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत नोंदणी होईल आणि दुपारी 12:30 नंतर कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालिम संघाचे नगर शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, पै. विलास चव्हाण, पै. मोहन हिरणवाळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष पप्पू शिरसाठ, नेवासा तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, शेवगाव तालुकाध्यक्ष विक्रम बारवकर, अकोले तालुकाध्यक्ष सोमेश्‍वर धुमाळ, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पै. संदीप बारगुजे, कर्जत तालुकाध्यक्ष पै. ऋषीकेशे धांडे, राहुरी तालुकाध्यक्ष सुनिल अडसुरे, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, पै. बाळू भापकर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दिपक डावखर, जामखेड तालुकाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी श्रीधर मुळे, संगमनेर तालुकाध्यक्ष भागवत ठोंबरे आदी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *