विज्ञानातील संशोधन सामाजिक विकासाला चालना देणारे -प्रा. रावसाहेब सातपुते
नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील ग्रामीण विकास मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण या थीमवर विज्ञान प्रदर्शन पार पडले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या कल्पना शक्तीची चुणूक दाखवली. तर सादर केलेल्या विविध प्रकल्प पाहून पालक वर्ग अवाक झाले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा वाढून त्यांच्यातील कला कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी स्मार्ट वॉच, हेअर ड्रायर, हेलिकॉप्टर, कॅलक्युलेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, एटीएम मशीन, रोबोट, एलईडी बल्ब, लॅपटॉप, मोबाईल, रेफ्रिजरेटर, सीसीटीव्ही कॅमेरा, ब्ल्यू टूथ डीव्हाईस यांसारख्या उपकरणांचे प्रकल्प सादर केले होते. बालसंशोधकांनी उपकरणांची कार्यप्रणाली, उपयोग आणि त्यांचे महत्त्व विशद केले.
यावेळी प्राचार्या रावसाहेब सातपुते म्हणाले की, विज्ञानाचे महत्त्व समाजाच्या शाश्वत विकासासाठी अनन्यसाधारण आहे.
विज्ञानातील संशोधन सामाजिक विकासाला चालना देणारे ठरतात. जागतिक विज्ञान दिवसाच्या उपक्रमांद्वारे विज्ञानाच्या उपयोगितेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. समाजातील शाश्वत आणि शांततापूर्ण वातावरणासाठी विज्ञानाचा वापर आवश्यक आहे. हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञानातील एकता निर्माण करण्यासाठी मदत करतो. विविध देश एकत्र येऊन विज्ञानाच्या साहाय्याने जागतिक समस्यांचे समाधान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपसला जावा यासाठी, त्यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
काजल महांडुळे यांनी डॉ. सी.व्ही. रमण यांच्या रमण इफेक्ट विषयी माहिती देऊन, भविष्यात आपल्या विद्यार्थ्यांपैकी शास्त्रज्ञ निर्माण व्हावे, अशी आशा व्यक्त केली. वैभव काळेपाटील यांनी विकासासाठी जागतिक विज्ञान दिनाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला विज्ञान क्षेत्रातील घडामोडींची माहिती देणे आणि समाजाला विज्ञानाच्या फायद्यांची जाणीव करून देणे. विज्ञान हे केवळ तंत्रज्ञानाचा वापर करण्यापुरते मर्यादित नसून ते एक विचार करण्याची पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यालयाच्या पूनम गुंजाळ, कल्पना आव्हाड, दिपज्योती करांडे, आरती मदने, सुदाम गव्हाणे, वनिता कारखले, प्रशांत सोनवणे, रवी गावडे, निर्मला नेहूल आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना मेने यांनी केले.