आनंदा दरेकर यांची जिल्हा जलसंधारणाकडे मागणी; आमदार पाचपुते आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन
बेसुमार पाणी उपसामुळे जनावरे, वन्यचर प्राण्यांवर पाणीबाणीचे संकट
नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथील पाझर तलावातून अवैध बेसुमार पाणी उपसा सुरु असून, तलाव हद्दीत विनापरवाना विहिरीमुळे येथील पाणी प्रश्न गंभीर बनला असल्याची तक्रार आनंदा दरेकर यांनी जिल्हा जलसंधारणाकडे केली आहे. तर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे आयोजित जनता दरबारामध्ये आमदार पाचपुते आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिले.
पाझर तलावातील बेसुमार पाणी उपसा आणि विनापरवाना विहिरीमुळे पाणी प्रश्न निर्माण झालेला असताना जनावरे, वन्यचर प्राण्यांवर पाणीबाणीचे संकट ओढवले आहे. सदर बाब ग्रामपंचायतला लेखी आवगत करुन संयुक्त सह्यांची मोहीम राबवत वरिष्ठ पातळीवर निवेदने सादर करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
हा पाझर तलाव गावासाठी प्रमूख पाणीपुरवठ्याचे जलस्रोत असून राखीव पाणीसाठ्याचा विचार न करता गावातील काही गैर मंडळींनी तलावाच्या भरावालगत विनापरवाना विहिरी पाडून, बेसुमार पाणी उपसा केल्यामुळे, अकाली तलाव पाण्यासाठयात घट झाली आहे. यामुळे गावची पाणीटंचाई, पशुपक्षी, वनचरे यांच्यावर गंभीर परिणाम होत आहे. याबाबत अधिकारी अनभिज्ञ असून, दिरंगाई होत आहे. या प्रकरणाकडे शासन अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर 191 ग्रामस्थांच्या सह्या असून, सदर निवेदन ठिकठिकाणी सादर केल्याचा राग मनात धरून येथील गैरमंडळींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जीवीतास धोका असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक व श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांच्याकडे देखील तक्रार दिली असल्याचे आनंदा दरेकर यांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासन व पोलिसांनी गांभीर्याने कारवाई करावी, अन्यथा श्रीगोंदा येथे होणाऱ्या पाणी वाचवा आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.