• Thu. Mar 13th, 2025

शिक्षणात संस्कारांचा समावेश करण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी

ByMirror

Mar 1, 2025

संस्कारांचा समावेश शिक्षणामध्ये अनिवार्य करणे, समाजहितासाठी आवश्‍यक

शिक्षण व्यक्तीमत्व घडवणारे, नैतिकता शिकवणारे आणि समाजहिताची जाणीव करून देणारे माध्यम असावे -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- शिक्षण हा केवळ माहिती मिळवण्याचा किंवा नोकरीसाठी पात्रता मिळवण्याचा भाग नाही, तर ते व्यक्तीमत्व घडवणारे, नैतिकता शिकवणारे आणि समाजहिताची जाणीव करून देणारे माध्यम असावे. भारताच्या संविधानातील कलम 21(अ) नुसार शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी, शिक्षणात संस्कारांचा समावेश करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे.


संस्कारावर बोलताना ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, शिक्षणाच्या संकल्पनेला केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. त्यात नैतिकता, संस्कार, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणप्रेम यांचा समावेश झाला पाहिजे. शिक्षणाने व्यक्तीला केवळ करियर आणि स्पर्धेच्या दिशेने न चालवता, त्यात नैतिक मूल्ये, समाजसेवा आणि पर्यावरणाची जबाबदारी शिकवली पाहिजे.


शिक्षणाच्या क्षेत्रात संस्कारांचा अभाव आणि त्याचे दुष्परिणाम सांगताना ॲड. गवळी म्हणाले की, आज शिक्षण पूर्णपणे करियर-केंद्री बनले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो. यामुळे भविष्यात पर्यावरणाच्या समस्यांची तीव्रता वाढणार आहे आणि समाजात स्वार्थीपणाची वृत्ती प्रबळ होईल. विद्यार्थ्यांमध्ये समाजहिताची जाणीव निर्माण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रत्येक विद्यार्थ्याला सद्गुण, सचोटी आणि सहानुभूती शिकवणारी प्रणाली आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे निसर्गप्रेम आणि पर्यावरणाची जबाबदारी विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या भविष्यातील पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. यासोबतच, समाजातील समरसता, बांधिलकी आणि नेतृत्वगुण वाढवणे आवश्‍यक आहे. आई जिजाऊंनी बालशिवाजींना उत्तम संस्कार दिले, ज्यामुळे त्यांच्यात स्वराज्य स्थापनेची जाणीव निर्माण झाली. त्याच संस्कारांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून देशासाठी प्रेरणादायक आदर्श निर्माण केला. योग्य संस्कारामुळे महान नेतृत्व निर्माण होऊ शकते. यासाठी संस्कारांचा समावेश शिक्षणामध्ये अनिवार्य असल्याचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने म्हंटले आहे.


ॲड. गवळी यांनी शिक्षणाच्या व्याख्येत संस्कारांचा समावेश करण्याची आवश्‍यकता व्यक्त केली. ते म्हणाले की, शालेय अभ्यासक्रमात नैतिकता आणि पर्यावरण शिक्षण अनिवार्य केले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी नवीन पद्धती अवलंबून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवले पाहिजेत. यासोबतच, समाजाने देखील शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


शिक्षण आणि संस्कार यांचा समावेश एकत्रित केल्याशिवाय खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडवता येणार नाहीत. त्यामुळे शिक्षण हा केवळ माहिती मिळवण्याचा अधिकार न राहता, तो व्यक्तिमत्व घडवण्याचे प्रभावी साधन व्हायला हवा. शुजलाम, सुफलाम भारत घडवायचा असेल, तर शिक्षण आणि संस्कार यांचा समावेश अनिवार्य असावा, असे देखील ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *