• Fri. Mar 14th, 2025

स्वारगेट बस स्थानक येथे तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

ByMirror

Feb 27, 2025

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील कोरटकरवर गुन्हे दाखल करा

तर बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल अपप्रचार व अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील कोरटकर आणि स्वारगेट (जि.पुणे) बस स्थानक मध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन, महापुरुषांच्या अवमानप्रकरणी कोरटकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची व स्वारगेट बस स्थानक येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, अमर निर्भवणे, विनोद गायकवाड, गणेश राऊत, दिलीप साळवे, लताताई भांड, प्रकाश साळवे, दिलीप साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


नागपूर येथील कोरटकर नामक व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांबद्दल अपमानकारक अपशब्द वापरून त्यांची अवहेलना केली आहे. वारंवार महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणारे मनुविचारसरणी व संकुचित प्रवृत्तीच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास अशा प्रवृत्तींना आळा बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


पुण्यातील मध्यवर्ती स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर झालेला अत्याचार अत्यंत गंभीर घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण परिस्थिती तशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न सातत्याने उपस्थित होत आहे. राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय योजना करण्याची आवश्‍यकता आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या अत्याचार प्रकरणात पोलीस प्रशासन कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


महापुरुषांबद्दल अपप्रचार व अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील कोरटकर याच्यावर नगर शहरात गुन्हा नोंदवावा, स्वारगेट बस स्थानक येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *