देव भक्तांच्या मदतीला नेहमीच धावून जातो -श्रीनिवास महाराज घुगे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या भक्तीमय किर्तनात भाविक तल्लीन झाले होते. महादेव मंदिरात रंगलेल्या किर्तनात ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांनी महादेवाची महती सांगतांना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
घुगे महाराज यांनी महादेवाच्या जीवनावर किर्तन करुन संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे निरुपम केले. तुकाराम महाराजांची पांडुरंगावर असलेली एकनिष्ठ भक्ती, देवाचे देव महादेवाची उपासना, परमार्थिक जीवनावर मार्गदर्शन केले. तर भक्तांची भक्ती, उपासनेला प्रसन्न होवून देव भक्तांच्या मदतीला नेहमीच धावून जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या किर्तनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
महाशिवरात्रीनिमित्त गावातील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे हे दहावे वर्ष होते. पंचक्रोशीतील भाविकांनी महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक अरुण फलके, साहेबराव बोडखे, उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भागचंद जाधव, गोरख फलके, कचरु कापसे, अनिल फलके, दत्तू फलके, अतुल फलके, भाऊसाहेब कापसे, राम जाधव, अरुण काळे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.