सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार जाहीर
मानव अधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे होणार व्याख्यान
नगर (प्रतिनिधी)- शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अहिल्यानगर मध्ये रविवारी दि.2 मार्च रोजी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती व्याख्यान व स्मृती प्रबोधन पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
भिस्तबाग रोड, प्रोफेसर चौक येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात सकाळी 12:30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तर यावेळी मानव अधिकार कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार तिस्ता सेटलवाड यांचे आजची राजकीय परिस्थिती व लोकशाहीचे भवितव्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. या समारंभासाठी सर्व डाव्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. ॲड. बन्सी सातपुते, कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, आर्किटेक्ट अर्शद शेख, कॉ. संतोष खोडदे, कॉ. संजय नांगरे, कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ. भारती न्यालपेल्ली, डॉ. बापू चंदनशिवे आदींसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, प्रगतशील लेखक संघ, पीस फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.