शासकीय जागेवरचे अतिक्रमण नसून, स्वत:ची मालमत्ता असल्याचे स्पष्ट
नोटीसमध्ये सुस्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भितीचे वातावरण
नगर (प्रतिनिधी)- घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 या रस्त्यासाठी अतिक्रमण हटविताना अंतराची सवलत मिळण्याची मागणी चांदा (ता. नेवासा) येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे केली आहे. रस्त्याच्या कडेला असलेली ही शासकीय जागेवरचे अतिक्रमण नसून, स्वत:ची मालमत्ता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांचा अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध नसून, दिलेल्या नोटीसमध्ये कोठे किती अतिक्रमण हटवावे याची सुस्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 जवळ असलेल्या ग्रामस्थ मिळालेल्या नोटीसद्वारे त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला राहणारे नागरिक कायमस्वरूपी रहिवासी असून, अनेक वर्षापासून स्वतःच्या जागेत राहत आहे. स्वतःच्या जागेत छोटे-मोठे व्यवसाय करीत असून, जागेची मालकी असणारे सिटीसर्व्हे ग्रामपंचायत मालमत्ता उतारे व शेतीचे सातबारा उतारे आहेत. सदर मालमत्ता धारकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपविभाग नेवासा यांनी 10 फेब्रुवारी रोजी सर्वच मालमत्ता धारकांना सरसकट अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसांमध्ये किती अंतरापर्यंत अतिक्रमण झाले आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांना बेघर करण्याची, व्यवसायिकांचा रोजगार हिसकावून घेण्याची व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणण्याची प्रशासन अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करत आहे.
दिलेल्या नोटीस मध्ये किती अंतरापर्यंत अतिक्रमण झाले आहे किंवा किती अंतरापर्यंत अतिक्रमण काढणे आवश्यक आहे? याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. काही नागरिकांनी स्वत:हून रस्त्याला अडथळा ठरणारा भाग काढून घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांचा अतिक्रमण काढण्यास विरोध नाही, फक्त अतिक्रमणचे अंतर हे 15 मीटर ऐवजी 12 मीटर करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अंतरामध्ये सवलत देण्याचे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मीनहाज शेख, तुकाराम चौधरी, आसिफ शेख, बाळासाहेब भोसले, मुनाजीर कुरेशी, सादिक शेख, अकिल शेख, दत्तू हजारे, सावता पुंड, नासिर शेख, असिफ देशमुख, मुसा सय्यद, रईस सय्यद, सोमा जावळे आदी उपस्थित होते.