विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जन्मापासून ते स्वराज्य स्थापने पर्यंतच्या पराक्रमाचा इतिहास केला जिवंत
महाराजांच्या विचाराने व संस्काराने मुले घडली पाहिजे -अभिषेक कळमकर
नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तसेच साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. जय भवानी… जय शिवाजी च्या जय घोषात संपूर्ण सभागृह दणाणला.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे, बाळ शिवाजीची रणनिती व मावळे, माँ साहेब जिजाऊंचे संस्कार, स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ तसेच अनेक गड व किल्ले जिंकत शत्रूंना यमसदनी धाडणारे शिवरायांचा पराक्रम विद्यार्थ्यांनी रंगमंचावर जिवंत केला. अश्वावर स्वार होऊन सभागृहात दाखल झालेले शिवाजी महाराजांच्या प्रवेशाने महाराजांचा एकच जयघोष करण्यात आला.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अंबादास गारुडकर, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, सुरेश थोरात, काकासाहेब वाळुंजकर, निलेश मालपाणी, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, कैलास गुंजाळ आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी गुणवत्तेसाठी शाळा आघाडीवर असून, अनेक स्पर्धा परीक्षेत शालेय विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत तर मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहे. याशिवाय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिषेक कळमकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने व संस्काराने मुले घडली पाहिजे. महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. शिवरायांचा पराक्रम, संघर्ष, शौर्याचा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा, या उद्देशाने हे सांस्कृतिक कार्यक्रम दिशादर्शक आहे. शिवरायांचे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करुन जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विविध गीतांमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. प्रारंभी महाराष्ट्र शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या न्याय देता का न्याय! या नाटकाचे देखील सादरीकरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती जिवंत करुन येथील सण-उत्सव, रुढी-परंपरा, धार्मिक वातावरण, ऐतिहासिक ठेव्याचे दर्शन घडविण्यात आले.
शिवाजी महाराजांचा जन्म, मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ, विविध गड, किल्ले युक्ती आणि शक्तीने मिळवतानाचे दृश्य रंगमंचावर सादर करण्यात आले. अफजल खानाचा वधाचा प्रसंग यावेळी विद्यार्थ्यांनी जिवंत केला. उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. स्वराज स्थापन करुन झालेल्या राज्याभिषेकाच्या दिमाखदार सोहळ्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता दोमल व शिल्पा कानडे यांनी केले. आभार ज्ञानदेव पांडुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उर्मिला साळुंके, मिनाक्षी खोडदे, रुपाली वाबळे, अमित धामणे, मंगेश कारखिळे, जयश्री खांदोडे, शितल रोहोकले, भाग्यश्री लोंढे, भारती राऊत, इंदूमती दरेकर, पुनम घाडगे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.