• Fri. Mar 14th, 2025

केडगावला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ

ByMirror

Feb 21, 2025

श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक सोहळ्याचे आयोजन

मंदिरासाठी व धार्मिक कार्यासाठी कोणतीही कमतरता पडू देणार नाही -सचिन (आबा) कोतकर

नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील उदयनराजे नगर येथे श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी शिवलिलामृत पारायण आणि तपपुर्ती सोहळ्याचे प्रारंभ झाले. 20 ते 27 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याचे हे तेरावे वर्ष आहे.


या सप्ताहाचे उद्घाटन उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी माजी नगरसेवक गणेश कवडे, इंजि. प्रसाद आंधळे, सचिन सातपुते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, भूषण गुंड, सागर सातपुते, अशोक कराळे, महेश घोडके, महेश महाराज मडके, हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज जाधव, उद्योजक महेश वाळके, मुकुंद शेठ दळवी, सुनील उमाप, पोपट कराळे, भीमा सातपुते, ह.भ.प. बाळासाहेब मुंडे, ह.भ.प. मोकाटे, बाबुराव खोसे, गणेश भागवत, विठ्ठल साबळे, खेडकर मेजर, संजय खामकर, विशाल सकट, मच्छिंद्र भांबरे, स्वप्नील पवार, गोरक्षनाथ कोकाटे, योगेश डोंगरे, राजेंद्र कोल्हे, रोहित धांडे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन, प्रतिमापूजन व तुलसी पूजन पार पडले. प्रास्ताविकात गणेश सातपुते म्हणाले की, समाजात व भावी पिढीत संस्कार रुजवण्यासाठी आणि आपल्या धर्माचे ज्ञान देण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. धर्म व परमार्थातून यशस्वी जीवनाची वाटचाल करता येणार आहे. यासाठी सर्वांना या धार्मिक सोहळ्यातून जोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सचिन (आबा) कोतकर म्हणाले की, प्रत्येक वर्षी 30 ते 32 सप्ताह केडगाव मध्ये होतात. हिंदुत्व व समाजासाठी संस्काराची चळवळ या उपनगरात चालवली जात आहे. यासाठी कोतकर परिवाराचा नेहमीच पुढाकार व सहकार्य राहिले आहे. मंदिरासाठी व धार्मिक कार्यासाठी कोतकर परिवार व मित्र मंडळ सातत्याने धावून जातात. धार्मिक कार्यासाठी कोणतीही कमतरता पडू देत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर परमार्थासाठी स्वतःच्या हिशोबाने व्यवसाय करण्याचे त्यांनी युवकांना आवाहन केले. गणेश कवडे यांनी शहर, उपनगरात खऱ्या अर्थाने सप्ताहाची गरज आहे. संस्कारापासून लांब चाललेली पिढी या सप्ताहातून धर्माला जोडली जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेने व हरिभक्त परायण महेश महाराज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडत आहे. सात दिवस या सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन सेवा होणार असून, काकडा, भजन, ज्ञानेश्‍वरी आणि शिवलीलामृत पारायण, हरिपाठ, महाआरती आणि हरिकीर्तनयांसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *