जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची रंगली मिरवणुक; युद्ध कलेच्या धाडसी थरारक प्रात्यक्षिकाचे सादरीकरण
पूर्वजांच्या इतिहासाचा पराक्रम प्रेरणा देणारा ठरणार -कुणाल मालुसरे (तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज)
नगर (प्रतिनिधी)- जैनाचार्य श्री शिवमुनीजी (जे.एस.एस.) गुरुकुल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने केडगाव येथून मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दानपट्टा यांसह युद्ध कलेच्या धाडसी थरारक प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

केडगाव मधील अंबिका नगर, पाटील कॉलनी आणि केडगाव वेस येथे विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी मर्दानी खेळाचे धाडसी प्रात्यक्षिक सादर केले. या मिरवणुकीचे अंबिका नगर बस स्टॉप येथे संदीप कोतकर युवा मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर मंचच्या वतीने झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते स्वराज्य निर्माणासाठी गाजवलेले पराक्रमाचा इतिहास नाट्यातून जिवंत केला.
संदीप कोतकर युवा मंचच्या वतीने झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे, मिलिंद एकबोटे, राजेंद्र मोहिते, सचिन भोसले पाटील, संदीप कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, विद्यालयाचे प्राचार्य आनंद कटारिया निकिता कटारिया, मीरा थोरात, आयोध्या कापरे यांसह विद्यार्थी पालक आणि केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आरतीने अभिवादन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पूर्वजांच्या इतिहासाचा पराक्रम पाहून भारावलो. आयुष्यात पुढे जाताना आपल्या पूर्वजांचा पराक्रम प्रेरणा देणारा ठरणार असल्याची भावना तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे यांनी व्यक्त केली. प्राचार्य आनंद कटारिया यांनी म्हणाले फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता त्यांना पराक्रमाचे धडे व संस्कार देखील शाळेत दिले जात आहे. सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे विचार रुजवून साजरी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी बाळ शिवबा जन्मला गीत सादर केले. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर गड आला, पण सिंह गेला! हे नाटकाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विद्यार्थ्यांनी जामखेड येथील प्रशिक्षक प्रशिक्षक सुरेश राऊत व आकाश सर यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी प्रात्यक्षिक सादर केले होते.