पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार; नवविवाहित दांपत्यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन
सशक्त समाज निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल – ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- भावी पिढीत शिवरायांचे विचार रुजविण्यासाठी आणि राजमाता जिजाऊ यांचे संस्काराच्या प्रचार प्रसारासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ संस्कार महोत्सवाला प्रारंभ करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्माधिकारी मळा, सावेडी येथील येथील ग्रीन पार्क येथे नवविवाहित दांपत्य प्रिया दंगट व अनिकेत दंगट यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून आपल्या भविष्यातील पिढीला राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराने उत्तम संस्कार देण्याचे आवाहन केले जाणार आहे.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, हरिभाऊ दांगट, रंजना दांगट, कोंडाबाई दांगट, पूजा पाटील, पूजा शिंदे, सुनिता गवळी, संध्या पवार, योगिता शेटे, रोहन बोरा, आप्पासाहेब ठाकर, गोरक्षनाथ दांगट आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भारताच्या इतिहासात राजमाता जिजाऊ यांचे योगदान अपरंपार आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि योग्य मार्गदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे न केवळ महान योद्धे, तर आदर्श शासक आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व बनले. या ऐतिहासिक परंपरेला पुढे चालवण्यासाठी, राजमाता जिजाऊ संस्कार महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
संस्कार हे केवळ रक्तातून येत नाहीत, तर ते शिकवणी, आचरण, आणि जीवनातील अनुभवातून निर्माण होतात. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वाभिमान, शिस्त, लोकसेवा आणि आदर्श प्रशासनाचे धडे दिले. आजच्या काळातही हेच संस्कार मुलांना दिले गेले पाहिजेत. सशक्त समाज निर्माण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या तत्त्वांचा प्रचार करणे आहे. या तत्त्वांचे पालन करून देश भ्रष्टाचारमुक्त, आळस-मुक्त आणि न्यायसंगत प्रशासन निर्माण होण्यास मदत होणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
नव्याने सुरु करण्यात आलेल्या या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. नवविवाहित दांपत्येही या कार्यक्रमात जिजाऊ आणि शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मुलांवर शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार घडविण्याचे संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आजच्या युगातही जिजाऊ आणि शिवरायांच्या शिकवणीचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या आदर्शांचे अनुसरण केल्यास समाजात न्याय, सुव्यवस्था आणि समृद्धी प्रस्थापित होईल. म्हणूनच, राजमाता जिजाऊ संस्कार महोत्सव हा केवळ एक सोहळा नसून, एक चळवळ आहे, जी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजात शिवाजी महाराजांच्या विचाराने बंधूभाव वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार रुजविल्यास सशक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे अशोक सब्बन यांनी सांगितले.