• Thu. Oct 16th, 2025

छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी

ByMirror

Feb 20, 2025

प्रा. माणिक विधाते यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

चित्रपटाच्या माध्यमातून नागरिकांना छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष अनुभवता येणार

नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा इतिहास सांगणाऱ्या छावा हा चित्रपट राज्य सरकारकडून टॅक्स फ्री करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि श्री विशाल गणपती मंदिर देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांनी केली आहे. या चित्रपटाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवून सदर चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


हा चित्रपट युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित असून, महाराष्ट्रातील शिवभक्तांमधून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले व या भूमीत जन्मलेल्या या दोन्ही महाराजांनी अखंड हिंदुस्तानचा इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आणि त्यांचे संघर्ष अनुभवता येणार आहेत. हा चित्रपट टॅक्स फ्री होणे आवश्‍यक आहे, जेणेकरून सर्व सामान्य जनतेला चित्रपट पाहता येणार आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्रात अनेकदा ऐतिहासिक, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर आणि महापुरुषांच्या जीवन संघर्षावरील आधारित चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलेले असून, महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची ही भावना असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


अहिल्यानगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी स्वखर्चाने महिलांसाठी छावा चित्रपट सिनेमागृहात मोफत उपलब्ध करून दिला आहे. लाडक्या बहिणींना हा चित्रपट मोफत दाखविला जात आहे. राज्य सरकारने देखील चित्रपटाच्या प्रसारासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *