• Thu. Mar 13th, 2025

तारकपूरला 72 तास स्माईल केअर सेंटरचे उद्घाटन

ByMirror

Feb 18, 2025

पूर्ण जबड्यांचे पुनर्वसन करुन कृत्रिम दंतरोपणाची अवघड प्रक्रिया होणार सुरळीत

नागरिकांचे आयुष्य वाढविण्याचे व जीवन सुखकर करण्याचे काम डॉक्टर करत आहे -आ. मोनिकाताई राजळे

नगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील साई केअर दातांचा दवाखाना येथे अद्यावत सुविधायुक्त 72 तास स्माईल केअर सेंटरचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते झाले. या सेंटरच्या माध्यमातून 72 तासात पूर्ण जबड्यांचे पुनर्वसन करुन कृत्रिम दंतरोपणाची अवघड प्रक्रिया होणार आहे.


या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक गोरे, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. भूषण निकम, माजी नगरसेवक निखिल वारे, अजिंक्य बोरकर, डॉ. डी.डी. पंडित, संचालक डॉ. संजय असनानी, डॉ. लक्ष्मण माळकुंजे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉक्टर संजय असनानी यांनी 72 तास स्माईल केअर सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण जबड्यांचे पुनर्वसन करता येणार व दंतरोपण करून रुग्णाला अद्यावत सुविधा दिली जाणार आहे. उत्कृष्ट दर्जाची सर्वोत्तम सेवा घेऊन हॉस्पिटलची वाटचाल सुरू असून, ही सुविधा तोंडाचा कॅन्सर झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, ग्रामीण भागात आरोग्याबाबत जागृती नसल्याने मोठ्या आजारांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. तोंडाचा कॅन्सर झपाट्याने वाढत असताना, यासाठी जागृती होणे आवश्‍यक आहे.

नागरिकांमधून कॅन्सरची भीती घालवून हा आजार प्राथमिक अवस्थेत उपचार केल्यास पूर्ण बरा होणारा आहे. आजारांचे अनेक प्रकार पुढे येत असल्याने त्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची मागणी देखील वाढत आहे. नागरिकांचे आयुष्य वाढविण्याचे व जीवन सुखकर करण्याचे काम डॉक्टर करत असल्याचे त्यांनी सांगितले.


राजकारणात कार्यरत असताना लोकप्रतिनिधी नागरिकांच्या विविध प्रश्‍नांवर उपचाराचे काम करत असतात. डॉक्टरांकडे विविध आजार घेऊन रुग्ण उपचारासाठी येतात, त्याचप्रमाणे शेताचे बांध, रस्ते, पाणी आदी सामाजिक प्रश्‍न सोडविण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असल्याचेही आमदार राजळे यांनी सांगितले.


डॉ. सतीश सोनवणे म्हणाले की, उपचारानंतर तोंडाच्या कॅन्सर मधून बाहेर पडलेला रुग्णाच्या जबड्याचा काही भाग काढावा लागतो. यासाठी जबड्याची पुनर्बांधणी व दंतरोपण आवश्‍यक ठरते. ही मोठ्या शहरात असलेली खर्चिक सुविधा योग्य दरात नगर शहरात उपलब्ध होणार आहे. शहराची गरज ओळखून ही सेवा अद्यावत तंत्रज्ञानासह सुरू करण्यात आलेली सेवेचा लाभ गरजूंना घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. एस.एस. दीपक यांनी प्राथमिक अवस्थेत निदान व उपचार झालेला कॅन्सर बरा होतो. यासाठी रुग्णाने जागरूक राहून उपचार करण्याची गरज आहे. मुखाच्या कर्करोगाने जबड्याची मोठ्या प्रमाणात हानी होते, ही हानी भरून काढण्याचे काम या अद्यावत तंत्रज्ञानाने होणार असल्याची माहिती दिली. तर दरवर्षी 15 टक्क्यांनी कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे गंभीर धोके त्यांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी 72 तास स्माईल केअर सेंटरला भेट देऊन नव्याने सुरु झालेल्या या विभागाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी उद्योजक जनक आहुजा, धनंजय भंडारे, अनिश आहुजा, प्रशांत मुनोत, डॉ. आकांशा गर्जे, हरजितसिंह वधवा, मनोज असनानी, मुकेश असनानी, योगेश मालपाणी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. प्रसन्ना यांनी केले. आभार डॉ. मानसी असनानी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *