खेळाडूंचा गौरव
शर्मिला शेख राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षा उत्तीर्ण
नगर (प्रतिनिधी)- धर्मास् तायक्वांदो अकॅडमी व आयडियल ग्रुपच्या दहा खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. तसेच ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन शर्मिला शेख यांची राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य प्रशिक्षक धर्मनाथ घोरपडे, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम सानप, सबिल सय्यद, साहिल सय्यद, नीता शिंदे, अल्ताफ खान, सचिन कोतकर, सुजित हजारे आदींसह खेळाडू व पालक उपस्थित होते.
धर्मनाथ घोरपडे म्हणाले की, शिक्षणाबरोबर खेळाला देखील महत्त्व आले आहे. अनेक मुला-मुलींनी खेळातून आपले करियर घडविले आहे. विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने व शारीरिक तंदुरुस्तीसाठी तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात आहे. या खेळातून शारीरिक व्यायाम होऊन स्वसंरक्षणाचे धडे देखील मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अकॅडमीच्या खेळाडूंनी तायक्वांदो खेळाचे चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आर्यन जाधव, नील लखापती, स्वराज वाघ, हर्ष आगलावे, रेहान शेख, श्रेयांश वाघ, युगंधरा जाधव, नक्षत्र नक्का, अक्षरा वाणे यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले.