खो-खो, कबड्डी, गोळा फेक, धावणे स्पर्धेचा रंगला थरार
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, जय युवा अकॅडमी, श्री आदिनाथ ग्रामीण बहुउद्देशीय संस्था व उडान फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरात जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये शालेय मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन घडविले. खो-खो, कबड्डी, गोळा फेक, धावणे अशा मैदानी क्रीडा स्पर्धांचा थरार रंगला होता.

स्पर्धेचे उद्घाटन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांच्या हस्ते झाले. वाडिया पार्क क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. विजेत्यांना डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विजेत्या व उपविजेत्या व तृतीय क्रमांकाच्या संघांना व खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल, चषक देण्यात आले. यावेळी जय युवा अकॅडमीचे श्रीकृष्ण मुरकुटे, रमेश गाडगे, दिनेश शिंदे, तेजस केदारी, तुषार शेंडगे आणि अनेक खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
ॲड. महेश शिंदे यांनी जीवनात खेळ आनंद निर्माण करतो. तर जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. त्यांनी खेळाचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांना एकतरी मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन केले. पै. नाना डोंगरे यांनी क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच खेळांमध्येही सहभाग घेण्याचे सुचवले.
या स्पर्धेतून विजेते खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
स्पर्धेतील निकाल:-
कबड्डी (मुले):- विजेता: त्रिमूर्ती युवा क्लब (शेवगाव), उपविजेता: बिरोबा ग्रुप (निमगाव वाघा), तृतीय: शिव संघर्ष कबड्डी क्लब (वडगाव गुप्ता).
खो-खो (मुली):- विजेता: सरस्वती ग्रुप (निमगाव वाघा), उपविजेता: श्री श्री नरसिंह ग्रुप (चास), तृतीय: भाग्योदय विद्यालय (भोयरे पठार).
धावणे (100 मीटर) मुले:- प्रथम- सुजित बोरुडे, द्वितीय- शहाजी चतुर, तृतीय- गणेश पवार, मुली:- प्रथम- प्रतीक्षा कला, द्वितीय- सिद्धी कापसे, तृतीय- मोहिनी वाघुले.
गोळा फेक मुले:- प्रथम शुभम जाधव, द्वितीय- ओमकार भुसारे, तृतीय- ज्ञानेश्वर कराळे, मुली:- प्रथम- वैशाली आढाव, द्वितीय- अपूर्वा कापसे, तृतीय- पूनम जाधव.