महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अत्यंत दिमाखदार व मान-सन्मानपूर्वक होईल -आ. रोहित पवार
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आमदार रोहित पवार यांना कर्जत येथे 66 वी वरिष्ठ गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024-25 आयोजन करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. आमदार रोहित (दादा) पवार मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन स्विकारण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा तालीम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, नगर शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पप्पू शिरसाठ, शेवगाव तालुका तालीम संघाचे अध्यक्ष विक्रम बारवकर, पै. ऋषिकेश धांडे, पै. काका शेळके, मिठू धांडे, विजय मोढळे, आसिफ शेख आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा तालीम संघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे 2024-25 च्या 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाच्या आयोजनाची मागणी केली होती. त्याला मान्यता मिळाली असून, या स्पर्धेचे आयोजनाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबाबत अत्यंत दिमाखदार आणि योग्य पद्धतीने आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, वस्ताद व पैलवानांचा योग्य मान-सन्मान करून ही स्पर्धा पार पडली जाणार आहे. कुस्ती स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडेल, अशी अपेक्षा तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.